प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘पंढरपूर येथील आषाढी एकादशी’च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न झाली. राज्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या या वारीच्या पार्श्वभूमीवर आणि यंदा पावसाचे लवकर आगमन झाल्याने पालखी मार्गावर फिरती शौचालये, स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा आणि पोलीस बंदोबस्त यांसारख्या सुविधा अधिक प्रभावीपणे नियोजित करण्याची गरज आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष प्रशासनाने तयारीचे सादरीकरण केले, तर प्रमुख दिंडी प्रतिनिधी आणि मंदिर विश्वस्तांनी आपापल्या अडचणी मांडल्या. लाऊडस्पीकर बंदी, रस्ते रूंदीकरण, वाखरी येथे मॉडेल वारकरी तळ उभारणे, कार्डियाक अॅम्ब्युलन्स, दर्शन पासचे नियोजन, औषध साठा आणि वॉटरप्रूफ तंबूंवर विशेष चर्चा झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, यंदाची वारी अधिक व्यापक, सूक्ष्म आणि समन्वयपूर्ण असेल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी पालखींच्या स्वागतासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी आणि रस्त्याच्या कडेला अडथळा न होता मंडप उभारावेत, अशी सूचना करण्यात आली. इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या पालख्यांसाठी विभागीय आयुक्तांनी तात्काळ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही आदेश दिले गेले.
बैठकीत पोलीस बंदोबस्ताच्या दृष्टीनेही ठोस उपाययोजना आखण्यात आल्या. कोणतीही पालखी पोलिसांच्या उपस्थितीशिवाय प्रवास करत नसावी याची दक्षता घेण्याचे निर्देश देताना वाहतूक नियंत्रण, अपघात प्रतिबंध, आणि दिंडी व्यवस्थापनासाठी ठोस कृती आराखडाही तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
वाखरी येथे सर्व मानाच्या पालख्या एकत्र येतात. याठिकाणी संत नामदेव महाराज ओट्याचा पुनर्विकास, गर्दी नियंत्रण आणि विशेष मॉडेल वारकरी तळ उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
दरवर्षी या वारीत 15 ते 20 लाख वारकरी सहभागी होतात. त्यांच्या सुरक्षेसाठी ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ यंदाही सुरू राहणार असून, मानाच्या पालख्यांसाठी दर्शन पासची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
वारीला केवळ आध्यात्मिक नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचे रूप असल्याने ‘निर्मल वारी, हरित वारी’ उपक्रमांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. महिलांसाठी प्रयागराज कुंभाच्या धर्तीवर ‘हिरकणी कक्ष’ व स्वतंत्र स्नानगृहांची सुविधा, रस्त्याच्या कडेला सावली देणारी देशी झाडे, स्वच्छता व्यवस्थापन, कचरा संकलन, पावसामुळे 36 वॉटरप्रूफ मंडपांची व्यवस्था करण्याचेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
या नियोजनामुळे वारीचा अनुभव वारकऱ्यांसाठी अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि श्रद्धेने भरलेला ठरणार आहे.
बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी व मानाच्या 10 दिंड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
