अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतिष कडू
हज यात्रेकरूंना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे
विभागीय आयुक्त बिदरी
हज यात्रा’ सुविधा संबंधी घेतला आढावा
23 ते 30 मे दरम्यान 2100 यात्रेकरू होणार रवाना
*नागपूर,दि. 15* : विदर्भासहित महाराष्ट्र, छत्तीसगड आणि बिहार येथून 23 ते 30 मे दरम्यान नागपूर येथून हज यात्रेसाठी 2108 यात्रेकरू प्रस्थान करणार असून या यात्रेकरुंना प्राधान्याने आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध विभाग प्रमुखांना सोपविलेली जबाबदारी वेळेत व चोखपणे पूर्ण करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली‘हज यात्रा 2025’ सुविधा संबंधी आढावा बैठक झाली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर आयुक्त तेजूसिंग पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे, महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष असिफ खान, संचालक सलिम बागवान व समितीच्या कार्यकारी अधिकारी मेघना शिंदे यांच्यासह पोलीस प्रशासन, महानगरपालिका, विमानतळ प्रशासन, वाहतूक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, एअर इंडिया आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून हज यात्रेसाठी दिनांक 23 मे ते 30 मे जून 2025 दरम्यान महाराष्ट्रातील 1521 यात्रेकरूंसह छत्तीसगड आणि बिहार येथील 587 असे एकूण 2108 हज यात्रेकरु प्रस्थान करणार आहेत. हे यात्रेकरू 30 जुन ते 3 जुलै 2025 दरम्यान हज यात्रेवरुन परतणार आहेत. या दरम्यान यात्रेकरुंची शहरातील ‘हज हाऊस’ येथे निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
‘हज हाऊस’ येथे यात्रेकरुंसाठी उभारण्यात येणारे विविध मदत कक्ष, विमानतळावर पुरविण्यात येणाऱ्या आवश्यक सुविधा तसेच विमानतळावरील मदत कक्षांच्या तयारीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. यात्रेकरुंचा ‘हज हाऊस’ येथील वास्तव्य तसेच विमानतळ परिसरातील व्यवस्था याबाबत संबंधित शासकीय यंत्रणांनी पुरवावयाच्या सुविधा व व्यवस्थेबाबत गतीने कार्य करावे व उत्तमोत्तम सोईसुविधा उपलब्ध करुन द्याव्या,अशा सूचना यावेळी श्रीमती बिदरी यांनी दिल्या
