किशोर गुडेकर | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज
‘आपलं घर’ संस्थेच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त सन्मान
पुणे : सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे येथे असलेल्या ‘आपलं घर’ या संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी सन्मानित केले जाते. यंदा 1 मे 2025 रोजी संस्थेचा 23 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी तीन मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. दिलीप देवधर आणि शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या रूचिरा सावंत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर, स्व. वैभव फळणीकर स्मृती पुरस्कार 2025 हा यंदा विजय धोंडू कलमकर यांना जाहीर करण्यात आला.
शारीरिक अडचणींवर मात करत दिव्यांग बांधवांसाठी ‘स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांनी सातत्याने कार्य केले. सुधाताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्वावलंबी प्रकल्प राबवून त्यांनी दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ‘आपलं घर’ संस्थेने त्यांना या पुरस्कारासाठी गौरवले.
हा पुरस्कार सामाजिक भान असलेले उद्योगपती श्री. चंद्रशेखर शेठ आणि मराठवाडा मित्र मंडळ शिक्षण संस्थेचे प्रमुख भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
विजय कलमकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “पुरस्कार म्हणजे केवळ गौरव नव्हे तर संस्थेचे कार्य अधिक व्यापक करण्याची संधी असते. हा सन्मान माझ्यासह ‘स्नेहज्योत’ परिवारातील प्रत्येक सदस्याचा आहे.”
