उमरेड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पस्तीस लाखांची मदत
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून कार्यवाही पूर्ण
प्रतिनिधी सतीश कडू
मुंबई दि. ७ : नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील एमआयडीसीमध्ये असलेल्या एमएमपी इंडस्ट्रीज लि. या ॲल्युमिनियम फॉईल फॅक्टरीमध्ये ११ एप्रिल २०२५ रोजी स्फोट होऊन ७ कामगारांचा मृत्यू झाला. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून पस्तीस लाख रुपयांची मदत वितरीत करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
उमरेड एमआयडीसीमधील ॲल्युमिनियम फॉइल फॅक्टरीत ११ एप्रिल २०२५ ला सायंकाळच्या सुमारास भीषण स्फोट होऊन ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. जखमी व्यक्तीला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात जिल्हा प्रशासनाने हलविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमी झालेल्या रुग्णांची थेट रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी जखमींच्या नातेवाईकांशी चर्चाही केली.
या प्रत्यक्ष भेटीदरम्यान ज्या कुटुंबांनी आपल्या घरातील सदस्य गमावले आहेत अशा कुटुंबांसोबत राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार मृतांच्या कुटुंबांतील वारसाला ५ लाख रुपये, अशा रितीने ७ कुटुंबियांना ३५ लाख रुपयांची मदत वितरीत करण्याची कार्यवाही पूर्ण केल्याचे नाईक यांनी सांगितले.
ही मदत केवळ आर्थिक आधार नसून, कठीण काळात सरकार नागरिकांच्या पाठीशी उभे असल्याचे द्योतक आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून या कुटुंबांना काही अंशी दिलासा मिळावा यासाठीचा हा प्रयत्न आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
