अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
स्नेहज्योतचं दिव्यांग सेवेसाठी नवं केंद्र कांदिवलीत सुरू
प्रतिनिधी- किशोर रमाकांत गुडेकर
मुंबई (कांदिवली ),समाजातील दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान ही संस्था अतिशय पायाभूत कार्य करत आहे. बोरिवली येथील श्रीकृष्ण नगर मधील एका छोट्याशा जागेतून आपले दिव्यांग पुनर्वसनाचे कार्य महाराष्ट्रभर पोहोचवणाऱ्या स्नेहज्योत चे अजून एक दिव्यांग पुनर्वसन केंद्र आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी कांदिवली पूर्व येथे सुरू झाले आहे. स्नेहज्योत चे प्रामाणिक कार्य आणि दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यात स्नेहज्योत ने केलेल्या योगदानाने प्रभावित होऊन ज्येष्ठ उद्योगपती व समाजसेवक श्री पियुष भाई शहा यांनी गुंडेचा इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व येथील एक जागा स्नेहज्योतच्या कार्यासाठी देऊ केली. पियुष भाई शहा यांच्या हस्ते फित कापून एका छोटेखानी कार्यक्रमात स्नेहजोतच्या या कांदिवली युनिटचे उद्घाटन झाले. दिव्यांग जगदीश जयस्वाल याला व्यवसायासाठी श्री पियुष भाई शहा यांच्या तर्फे इलेक्ट्रिकल ट्रायसिकल देण्यात आली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ प्रोफेसर डॉक्टर हेमंत शिंदे ,उषा बांटीया तसेच उद्योजक व समाजसेवक श्री प्रदीप भाई शहा हे मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या सचिव सुधाताई वाघ, अध्यक्ष अपर्णा कायकिणी आणि खजिनदार श्री मिलिंद तेंडुलकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व ऋणनिर्देश केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संस्थेचे ट्रस्टी विजय कलमकर यांनी केले .कांदिवलीच्या या नवीन जागेत लवकरच दिव्यांग व्यक्तींसाठी फिजिओथेरपी आणि कौन्सिलिंग सेंटर सुरू करण्याचा स्नेहज्योतचा मानस आहे. दिनांक 5 मे ते 15 मे या दरम्यान स्लो लर्नर मुलांसाठी विशेष समर कॅम्प स्नेहज्योतने याच जागेत आयोजित केला आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी9820639230/7977001783 या क्रमांकावर संपर्क करावा.
