दिग्दर्शक-निर्मात्याविरुद्ध दादासाहेब फाळके चित्रपट युनियनची मोठी कारवाई
संपादक संतोष लांडे
कामगार दिनी युनिटकडून जबरदस्तीने काम करून घेतल्यामुळे पोलिसांकडे दिली तक्रार
मुंबई (दि. १ मे) – कामगार दिनाच्या दिवशी युनिटकडून सक्तीने काम करून घेतल्याच्या पार्श्वभूमीवर दादासाहेब फाळके चित्रपट युनियनने मोठी कारवाई करत संबंधित दिग्दर्शक व निर्मात्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
ही घटना मालाडच्या मढ भागातील ‘आर्य बंगला’ येथे ‘रणांगण’ या प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान घडली. ‘रस्क मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत हे चित्रीकरण सुरू होते. मात्र, कामगार दिन असूनही युनिटकडून परवानगीशिवाय सक्तीने काम करून घेतल्याचे समोर आल्यानंतर युनियनने तात्काळ पाऊल उचलले.
प्रॉडक्शन हाऊसच्या दक्षता विभागातील विवेक पाल (मालाड विधानसभेचे अध्यक्ष) आणि संदेश गव्हाणे (मुंबई उपनगर सचिव) यांनी या प्रकरणी पुढाकार घेतला. युनियनने शूटिंग थांबवत पोलिसांत तक्रार दाखल केली असून, संबंधित दिग्दर्शक व निर्माता यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
युनियनच्या या कडक भूमिकेमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. कामगारांच्या हक्कांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश युनियनने दिला आहे.
