अष्टसिद्धी पिक्चर्सच्या ‘किनारा – प्रेम आणि मैत्रीच्या पलीकडचा’ चा पुणे येथे शुभारंभ!
प्रतिनिधी -सारंग महाजन.
पुणे: अष्टसिद्धी पिक्चर्स निर्मित ‘किनारा – प्रेम आणि मैत्रीच्या पलीकडचा’ या चित्रपटाचा मुहूर्त अक्षय तृतीयेच्या शुभदिनी, पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. हा चित्रपट प्रेम आणि मैत्रीच्या पलीकडच्या एका अनोख्या कथेवर आधारित आहे, जो प्रेक्षकांना नात्यांमधील घनिष्ठता दाखवेल आणि त्यांच्या हृदयाला स्पर्श करेल.
या चित्रपटातून अभिनेता प्रताप गाडेकर प्रमुख भूमिकेत पदार्पण करत आहेत. त्यांच्यासोबत तितकेच निष्णात अभिनेता आनंद बुरड देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या दोन कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणे प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असेल.
‘किनारा’ चित्रपटाची निर्मिती दूरदृष्टीचे आणि कलाप्रेमी निर्माते अंतोदय नारायण सिन्हा करत आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा शैलीदार आणि संवेदनशील दिग्दर्शक प्रदीप गुरव यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यांच्या दिग्दर्शन कौशल्यातून ही कथा मोठ्या पडद्यावर जिवंत होणार यात शंका नाही.
चित्रपटाची कथा अभ्यासपूर्ण आणि भावनास्पर्शी लेखणीतून साकारली आहे, आणि ते श्रेय जाते लेखक अक्षय गायकवाड यांना. त्यांच्या लेखणीतील जादू प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. तसेच, चित्रपटाचे चित्रीकरण जादुई आणि नैसर्गिक असेल, ज्याची जबाबदारी छायाचित्रण संचालक सुशील शर्मा उत्तमरित्या सांभाळणार आहेत. ते कोकणातील विविध स्थळांना त्यांच्या कॅमेऱ्यातून एक खास रंगत देतील.
लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे, चित्रपटातील प्रमुख नायिकेसह इतर कलाकारांविषयीची अजून गुप्तता ठेवण्यात आली आहे. प्रेक्षकांना एका दर्जेदार चित्रपटाचा अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिग्दर्शक प्रदीप गुरव यांनी सांगितले.
