ग्रंथालयाबाबतीत शासनाचे असलेले उदासीन धोरणच हि आत्महत्या घडण्यास कारणीभूत
उप संपादक गणेश राउत
आत्महत्याग्रस्त ग्रंथालय कर्मचारी सतीश मधुकरराव मोतीखाये यांच्या कुटुंबीयाला शासनाने २५ लाख रुपये मदत करून त्यांच्या पत्नीस शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे.
*- लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे*
लातूर :- अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळाई येथील जयप्रकाश अग्रवाल सार्वजनिक वाचनालय ग्रंथालयातील कारकून सतीश मधुकरराव मोतीखाये वय २३ वर्षे यांनी आर्थिक परिस्थितीला कंटाळून ग्रंथालयाच्या परिसरातील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, बहिणीच्या लग्नाकरिता तीन वर्षांपूर्वी शेत विकले गेले. वडील जन्मा अगोदरच स्वर्गवासी झाले. वयोवृद्ध आई, विधवा बहीण, भाच्याचे शिक्षण व संगोपनाची जबाबदारी, बचत गट, फायनान्स कंपनीचे कर्जामुळे त्याची आर्थिक कोंडी झालेली होती. ग्रंथालयात कारकून म्हणून नोकरीस असलेल्या सतीश यास शासकिय नियमानुसार दरमहा केवळ ३८०० रुपये वर्षातून दोनवेळा शासकीय अनुदान जमा झाल्यावरच मिळत होते. दैनंदिन खर्च आणि कुटुंब चालविण्यात येत असलेल्या अडचणीने चिंताग्रस्त होऊन त्याने आत्महत्या केली.
ग्रंथालयाबाबतीत शासनाचे उदासीन धोरणच या आत्महत्या घडण्यास कारणीभूत ठरलेले आहे असे स्पष्ट मत लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी व्यक्त केले आहे.
तेव्हा शासनाने तात्काळ मयत सतीशच्या कुटुंबीयास पंचवीस लाख रुपये मदत करून मयत सतीश च्या पत्नीस शासकीय सेवेत तात्काळ सामावून घ्यावे अशी मागणी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे लोकाधिकार संघाच्या वतीने निवेदन पाठवून केली आहे. तसेच या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री मा. आमदार श्री एकनाथराव शिंदे व मा. नामदार श्री अजितदादा पवार, उच्च शिक्षण मंत्री मा. ना. श्री चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री गजानन कोटेवार यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत.
