‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ मध्ये पसायदान गाण्याचे भाग्य लाभले – बेला शेंडे
प्रतिनिधी गणेश तळेकर
*ज्ञानेश्वर माऊलींची विश्वप्रार्थना प्रथमच चित्रपटात*
‘ज्ञानदेवे रचिला पाया। उभारीले देवालया।।’ या अभंगाप्रमाणे अखिल वारकरी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी संप्रदायाचा पाया रचला. त्यांच्या भगिनी चित्कला मुक्ताबाई यांनी योगीयांना मार्गदर्शन करणारा ‘चांगदेव पासष्टी’सारखा अनमोल ग्रंथ लिहिला. याच मुक्ताबाईंच्या जीवनावर आधारलेला ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भक्तीरसाने ओतप्रोत भरलेला संगीप्रधान मराठी चित्रपट १८ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित यशस्वीरित्या प्रदर्शित
झाला. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती रेश्मा कुंदन थडानी यांनी केली असून, चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स या नामांकित वितरण संस्थेने केली आहे.
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या सुमधूर संगीताचे लोकार्पण ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी ‘ज्ञानेश्वरी’च्या रूपात संस्कृत भाषेतील भगवद्गीतेतील ज्ञान सर्वांसाठी खुले केले. भोळ्या भाबड्या वारकऱ्यांसाठी ‘हरिपाठ’ लिहिला. जगाने वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊनही त्यांनी ‘पसायदान’ रूपात विश्वासाठी प्रार्थना लिहीली. ही विश्वप्रार्थना म्हणजेच ‘पसायदान’ प्रथमच चित्रपटात समाविष्ट करण्यात आले आहे. आपल्या सदाबहार गायकीने आजवर अनेक गीते अजरामर करणाऱ्या पार्श्वगायिका बेला शेंडे यांनी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटासाठी पसायदान गायले आहे. या चित्रपटातील गाण्यांना अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी संगीत दिले आहे. ‘पसायदान’च्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींचे विचार सर्वदूर पोहोचवण्याची संधी मिळाल्याने बेलाच्या मनात ‘कृत कृत्य झालो। इच्छा केली ते पावलो।।’ अशीच काहीशी भावना आहे.
याबद्दल बेला म्हणाल्या की, या चित्रपटात मी चार अभंग गायले आहे. ‘मुंगी उडाली आकाशी…’, ‘घनू वाजे घुणघुणा…’, ‘आधी मध्य उर्ध्व…’ आणि ‘पसायदान – आता विश्वात्मके देवे…’. अवधूत गांधी आणि देवदत्त बाजी यांनी अतिशय सुरेल संगीत दिले आहे. ‘घनू वाजे…’ची नवीन चाल खूपच सुंदर आहे. नवीन चालीतील हे गाणेसुद्धा संगीतप्रेमींना प्रचंड आवडत असल्याचा आनंद आहे. कारण या गाण्याचा फील अत्यंत मेडीटेटीव्ह म्हणजेच ध्नाय लावणारा आहे. ते ऐकताक्षणी आपण एका वेगळ्या ट्रान्समध्ये जातो. ‘मुंगी उडाली आकाशी…’ हे गाणे नेहमीच्या भजनी ठेक्यातील आहे. चित्रपटात पहिल्यांदाच पसायदान ऐकायला मिळणार असून, ते मला गायला मिळाल्याचा खूप खूप आनंद आहे. पसायदान गाताना अत्यंत वेगळा अनुभव आणि प्रचिती येत असल्याचे सतत जाणवत होते. आपल्यासोबत माऊलींचा आशीर्वाद असल्यासारखे वाटत होते. जणू काही माऊलीच माझ्याकडून ते करवून घेत होते. पसायदानाची चाल मूळ वारकरी संप्रदायात गायली जाते तीच आहे. त्यात अवधूत गांधी यांनी अगदी हलकेसे बदल केले आहेत. पसायदानाची ही चाल पारंपरिकच आहे. चारही अभंग मला गाण्याची संधी दिल्याने दिग्पाल लांजेकर यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. ही सर्व गाणी आम्ही पुण्यात रेकॅार्ड केली आणि संपूर्ण सप्ताह याच गाण्यांच्या रेकॅार्डींगला दिला होता. त्यात मी कोणतेही काम घेतले नाही. कारण तो भक्तीमय मूड घालवायचा नव्हता असेही बेला म्हणाल्या.
पसायदान गाणे ही खूप मोठी जबाबदारी असल्याचे सांगत बेला म्हणाल्या की, पसायदानातील ऱ्हस्व, दीर्घ, विराम खूप महत्त्वाचे आहेत. गुरुजी श्यामराव जोशी यांनी पसायदान काय आहे, हे व्यवस्थितरीत्या समजावले. त्याचा अर्थ सांगितलाच, पण त्यातील पॅाज किती लांबवायचा आहे हे देखील सांगितले. रसिकांना हे ऐकताना नक्कीच जाणवेल. शब्दांच्या बाबतीत सांगायचे तर हे पसायदान साखरे महाराजांच्या संदर्भातील आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पसायदान आणि ज्ञानेश्वरीचा भाग होऊ शकल्याचा प्रचंड आनंद आहे. हे पसायदान माझ्यावर शूटही झाले असून, खूप सुंदर दिसत आहे. लवकरच हे युट्यूबद्वारे सर्वांपर्यंत पोहोचेल असेही बेला यांनी सांगितले.
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट सध्या प्रेक्षकांची मने जिंकत असून त्यातील गाण्यांना देखील उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
