संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा).पुणे : व्याजाने दिलेल्या पैशांची वसुली करण्याच्या नावाखाली पतीच्या गैरहजेरीत मित्र घरी येत होता. पत्नीच्या अनैतिक संबंधावरुन होणार्या मानसिक त्रासामुळे रिक्षाचालकांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. गळफास घेण्यापूर्वी त्याने बहिणीला फोन करुन फाशी घेतो, असे सांगितले. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी पत्नी आणि मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. सचिन सतिश गिरी गोसावी (रा. सिद्धीविनायक विहार, हांडेवाडी रोड, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत त्यांची बहिण सविता संतोष भारती (वय ३९, रा. आदर्शनगर, उरुळी देवाची) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कोमल सचिन गिरी आणि रवींद्र मेमाणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हांडेवाडी रोडवरील सिद्धीविनायक विहार येथे १७ एप्रिल रोजी मध्यरात्री १ ते सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन गिरी हा रिक्षाचालक असून त्याला दोन मुले आहेत. सचिन गिरी यांनी रवींद्र मेमाणे याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. घेतलेले पैसे सचिन वेळोवेळी परत देत होता. तरी सचिन घरी नसताना पैसे मागण्याकरीता रवींद्र मेमाणे हा घरी येत होता. याकारणावरुन दोघांमध्ये वाद होत होते. त्यावरुन सचिन आणि त्याची पत्नी कोमल यांच्यात वादावादी होत असे. फिर्यादी यांना हे समजल्यावर तिने कोमल हिला समजावून सांगितले होते. सचिन याची आई मीना गिरी (रा. तरवडे वस्ती) हिनेही तिला समजावून सांगितले होते. तरीही त्यांच्यात काही फरक पडला नाही. सचिन गिरी याने १७ एप्रिल रोजी पहाटे सव्वा वाजता फिर्यादी बहिणीला फोन केला. त्यावेळी त्याची पत्नी कोमल देखील कॉन्फरन्सवर होती. सचिन याने सांगितले की, तिच्या चिठ्ठ्या माझ्याकडे आहेत. त्यावर कोमल हिने मी तुम्हाला घरी येऊन सांगते, असे म्हणून फोन कट केला. त्यानंतर सचिन याने कोमलच्या वागण्यामुळे फाशीच घेणार आहे, असे बोलून फोन कट केला. फिर्यादी यांनी कोमल हिला फोन करुन सांगितले की, सचिन फाशी घेणार असल्याचे म्हणत आहे, त्यावर कोमल हिने मरु दे मला काय फरक पडत नाही, असे म्हणून फोन कट केला. फिर्यादी यांनी सकाळी आईला सचिनच्या घरी पाठविले तर त्याच्या खोलीचे दार आतून बंद होते. तेव्हा टेरेसवरुन मुलीला साडी बांधून बेडरुमच्या गॅलरीत सोडले. आत पाहिल्यावर सचिन याने बेडरुमच्या पंख्याला नायलॉनच्या दोरीने फाशी घेतल्याचे दिसून आले. पोलीस उपनिरीक्षक गायत्री बैरागी तपास करीत आहेत.
