डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सर्वोत्तम संविधान देऊन विकसित भारताचा रस्ता मोकळा केला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोरबा मिठागर, वडाळा, मुंबई येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या ‘पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण’ केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशामध्ये विषमतेची विषवल्ली पसरलेली असताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिकारांची लढाई उभी केली व समतेचे राज्य आणण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अन्यायाविरोधात तलवारीने लढाई केली व न्यायाचे, रयतेचे राज्य स्थापन केले. त्यामुळे तलवारीशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती अपूर्ण आहे. तशीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कुठलीही मूर्ती संविधानाशिवाय अपूर्ण आहे. कारण, संविधानाचा उपयोग करत कुरिती, कुचाली तलवारीप्रमाणे समाप्त करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सर्वोत्तम संविधान दिले आणि विकसित भारताचा रस्ता मोकळा केला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईशी अतूट नाते होते. मुंबईमध्ये सर्व पंथाचे, जातीचे, राज्याचे लोक राहतात म्हणून मुंबई महाराष्ट्राला देता येणार नाही, असा विचार तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वात मांडण्यात आला होता. मात्र, एकमेकातच रमलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार कधीच करता येणार नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठणकावून सांगितले. म्हणूनच भाषावार प्रांतरचना झाली त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हाच विचार पुढे नेण्याचे काम झाले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर, केंद्रीय मंत्री, प्रांतिक अध्यक्ष झाल्यानंतर, गोलमेज परिषदेवरून देशात परत आल्यानंतर, राज्यघटना पूर्ण करून परत आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला सत्कार मुंबईमध्येच झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वयाची 50 वर्ष पूर्ण केल्यानंतर अभिवादन सभाही मुंबईतच पार पडल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवनपटात त्यांना उजाळा देणारे, त्यांच्या स्मृती जागविणारे अनेक प्रसंग मुंबईने अनुभवले आहेत. त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन आणि प्रिंटिंगही मुंबईतच झाले. त्यांच्या राजकीय आयुष्याचे अनुष्ठान हे मुंबईतूनच सुरू झाले. शोषितांचा आवाज होऊन ते आयुष्यभर लढले. मुंबईतील त्यांच्या कार्य कर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी राज्य शासन इंदू मिल येथे त्यांचे भव्य स्मारक साकारत आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, आ. कालिदास कोळंबकर, आ. कॅप्टन आर. तमील सेल्वन व इतर मान्यवर उपस्थित होते.
