सहसंपादक गोपाळ भालेराव – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी व समाधी स्थळाचा जीर्णोद्धार शताब्दी कार्यक्रम येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा आणि संपूर्ण मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा गाढा अभ्यास करणारे, जगभरातून मराठ्यांच्या इतिहासाचे पुरावे मिळवून इतिहास समजून घेणारे, भारताचे गृहमंत्री अमित शाह किल्ले रायगडावर आले याचे समाधान वाटते. अमित शाह केवळ गृहमंत्री म्हणून नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेवक आणि मराठा इतिहासाचे संशोधक म्हणून या ठिकाणी आले आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संपूर्ण हिंदुस्थानात मोगलाई, कुतुबशाही, आदिलशाही राजवट होती. परकीय आक्रमकांचे राज्य कधीच संपणार नाही, हा अंधःकार संपून कधीच पहाट होणार नाही, असे वाटत होते. त्यावेळी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या तेजस्वी सुर्याचा उदय झाला आणि त्या सुर्याने आपल्याला स्वराज्याची पहाट दाखवली. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण कोणीही इथे दिसले नसतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करुन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच संपूर्ण भारतावर भगव्याचा अंमल अस्तित्वात आला, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महापुरुषांचा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरुन लोटले पाहिजे. आपण लोकशाही व्यवस्थेत असल्याने याबाबत लोकशाहीनुरुप नियम तयार करण्याचे काम निश्चितपणे करु, राज्य सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रमाण इतिहास निर्माण करण्याचे काम निश्चितपणे हातात घेऊ. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठी उच्च न्यायालयात लढून हे स्मारक उभारण्याचा प्रयत्न करु, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारताची राजधानी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी मदत करावी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळासाठी नॉमिनेट केले आहे. या अनुषंगाने फ्रान्समध्ये युनेस्कोसमोर सादरीकरण होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री आदिती तटकरे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.
