अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
ई ट्रांजिट हा शहर वाहतुकीसाठी चांगला पर्याय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आर्थिक बाजू तपासून घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
मुंबई, दि. ११ – शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी ई ट्रांजिट हा एक चांगला पर्याय असून याविषयी अधिकाऱ्यांनी आर्थिक बाजू तपासून अहवाल सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.
पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर ई ट्रांजिट सुरू करण्याविषयी HESS-AG कंपनीच्या प्रतिनिधींसोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणे गरजेचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कंपनीने त्यांची उत्पादने भारतात तयार करावीत. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन प्रकल्प खर्चातही बचत होईल. कमी किमतीमध्ये एक चांगली शहर वाहतूक व्यवस्था कंपनीने उपलब्ध करून दिल्यास राज्यातील किमान १० शहरांसाठी असे प्रकल्प उभारता येतील. त्यासाठी कंपनीने त्यांच्या ई ट्रांजिट बसेसचे उत्पादन देशातच सुरू करावे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात हा प्रकल्प सुरू करण्याविषयी सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या .
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सध्या वापरत असलेल्या ई बस, मेट्रो आणि ई ट्रांजिट यांच्या आर्थिक आणि इतर सर्व बाजू एकत्र विचारात घेऊन त्यानुसार प्रस्ताव तयार करावा. एक चांगला आणि व्यवहार्य प्रस्ताव कंपनीने द्यावा. मेट्रो सोबत आणखी एक पर्याय सध्या शहरांसाठी गरजेचा आहे. तो या ई ट्रांजिट सुविधेतून उपलब्ध होत असेल तर त्याचे स्वागतच आहे.
यावेळी मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विन भिडे, मुख्यमंत्री महोदयांचे सचिव डॉ. विकास खारगे,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांच्यासह HESS-AG कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सध्या अस्तित्वात असलेल्या मेट्रो, BRT यांना एकत्र करून एक HCMTR अशा वेगवान नागरी वाहतूक सुविधा उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्याअंतर्गत आज ई ट्रांजिट सुविधा या पर्यायावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
