मनोज चंद्रात्रे नागपूर, दि 4 एप्रिल :जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांत सुरू असलेल्या महा-ई-सेवा केंद्राच्या (सेतू) धर्तीवर नागपूर जिल्हा भूमि अभिलेख विभागांतर्गत शहर नगर भूमापन क्रमांक १ व कामठी येथील भूमि अभिलेख उपअधीक्षक कार्यालयात आजपासून अत्याधुनिक भूमापन केंद्र सुरू होत आहे. सर्व काही ऑनलाइन स्वरुपात व वेळेत सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या भूमापन केंद्रामुळे नागरिकांचे हेलपाटे वाचणार आहेत, अशी माहिती भूमि अभिलेखचे जिल्हा अधीक्षक अभय जोशी यांनी दिली.
यापूर्वी भूमि अभिलेख विभागातील विविध प्रकारच्या नकला मिळविण्यासाठी नक्कल अर्ज करण्यासाठी नागरिकांना छापील अर्ज करून हेलपाटे मारावे लागत होते. शिवाय ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नागरिकांची खासगी संस्थांकडून आर्थिक पिळवणूकही व्हायची. परंतु आता भूमापन केंद्रांच्या माध्यमातून सर्व सुविधा वेळेत व वाजवी दरात मिळणार आहेत. त्यासाठीच्या सेवेचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. प्रशासनातील विलंब कमी होऊन यामुळे लोकाभिमुख प्रशासनाला हातभार लागणार आहे. राज्यात अशी ३० भूमापन केंद्र आजपासून सुरू होत असून, नागपूर जिल्ह्यातील दोन केंद्रांचा त्यात समावेश आहे. उर्वरित तालुक्यांतही हे केंद्र लवकरच सुरू होणार आहेत.
या कार्यक्रमाला महसूल भूमि अभिलेख, नोंदणी व मुद्रांक विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. राजेशकुमार, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख डॉ. सुहास दिवसे उपस्थित राहणार आहेत.या मिळतील सुविधा
या केंद्रांमध्ये संगणकीकृत मिळकत पत्रिकेवरील फेरफार, सर्व प्रकारचे ऑनलाइन फेरफार अर्ज, ई मोजणी व्हर्जन २.० मधील सर्व प्रकारचे मोजणी नकाशे, मिळकतीचे डिजीटल सही केलेले फेरफार, नोंदवही उतारे आणि ऑनलाईन अर्ज करायची सुविधा, नकाशे व स्कॅन अभिलेखच्या डिजीटल सही केलेल्या नकला, परिशिष्ट अ व ब, नमुना नऊ व बाराची नोटीस, अर्जाचे पोच, रिजेक्शन पत्र, त्रुटी पत्र, निकाली पत्र, विवादग्रस्त नोंदवहीचा उतारा, अपिल निर्णयाची प्रत आदी कागदपत्रे जनतेला सरकारी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी ३५ ते १५५ रुपयांपर्यंत शुल्क असेल. मोजणी व फेरफारचे अर्जही येथे स्वीकारले जातील. त्यासाठी २५ रुपये शुल्क असेल.
नव्याने सुरू होत असलेल्या अत्याधुनिक भूमापन केंद्रामुळे जनतेला तात्काळ सेवा सुविधा उपलब्ध होतील व कार्यालयावरील कामाचा भार कमी होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोजणी व अन्य कामांसाठी वेळ देता येणार आहे.
अभय जोशी, (जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख)
