अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशन व रिलायन्स मॉलच्या वतीने गुढीपाडवा निमित्ताने नववर्षाचे स्वागत रिलायन्स मॉल एरंडवना येथे असंख्य महिलांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला. महाराष्ट्रात अनेक धार्मिक परंपरा, समृद्ध लोककला आणि साहित्य परंपरा आहे. आपली ही परंपरा व संस्कृती जतन करण्यासाठी वसुंधरा ग्रुपच्या संस्थापिका योगिता गोसावी यांनी हा सांस्कृतिक सोहळा आयोजित केला होता. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळेस महिला दक्षता कमिटी अध्यक्ष जयश्री पाटील, अभिनेत्री तेजस्विनी पायगुडे, सारिका रोजेकर, माधवी मोरे, वर्षा तांबोळी, प्रतिक वखारीया इ मान्यवर उपस्थित होते. गणेशवंदना नृत्य व शिवगर्जनाने कार्यक्रमाची सुरवात अतिशय दणकेबाज झाली. संजीवनी उन्हाळे व त्यांच्या ग्रुपने विठू माऊलीची पालखी व दिंडी नृत्य सादरीकरण इतके अप्रतिम केले की संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर त्यांच्या ग्रुपने आपल्या महाराष्ट्रात वर्षभर साजरे होणारे विविध सणांचे नृत्यातून अप्रतिम सादरीकरण केले. ढोलकी सम्राज्ञी लक्ष्मी कुडाळकर हिच्या ढोलकीची थाप व लावणी नृत्यांगना अनुजा पाटील यांच्या जुगलबंदीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. अनुजाने देवीचा जोगवा व गोंधळ नृत्य सादर केले. पांडुरंग मोटे, शुभदा कोकिल, स्मिता कुबडे व निशा सुतावणे या गायकांनी जय जय महाराष्ट्र माझा हे सामूहिक गायन सादर केले.
मराठी पाऊल पडते पुढे, म्यांनातून उसळे तलवारीची पात, जीवशिवाची बैलजोड या गाण्यांनी रसिकांची मने जिंकली. अश्विनी निकम व तिचा मुलगा शंभू यांनी शिवगर्जना व लाठी काठी यांचे उत्तम सादरीकरण केले. अनिता शिंदे व त्यांच्या ग्रुपने नृत्यातून सण कसे साजरे केले जातात याचे अप्रतिम सादरीकरण केले. रोहिणी अनास्कर व भारती नाईक यांनी भारुड सादर करून सर्वांना खूप हसवले. सर्वात शेवटी प्रज्ञा कडशी व त्यांच्या ग्रुपने लोकप्रिय कोकणी नृत्य सादर करून कार्यक्रमाची सांगता जल्लोषात झाली. सर्वांचे सादरीकरण इतके अप्रतिम होते की सर्वजण कार्यक्रम संपेपर्यंत जागचे उठले नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह होता. त्यानंतर 7 लकी ड्रॉ विजेत्यांना मृणाल पटवर्धन यांच्याकडून गिफ्ट देण्यात आले तर रिलायन्स मॉलच्या वतीने बंपर लकी ड्रॉ विजेत्या वृषाली शिंदे यांना आकर्षक गिफ्ट देण्यात आले. या कार्यक्रमासाठी गज पवित्रा नमकीन, स्वप्न फाउंडेशनच्या वर्षा तांबोळी यांनी सहकार्य केले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वंदना जैन, राधिका शिंदे, राधिका मेड, शैलेंद्र निर्मळे, स्वप्नील तलाठी व विशाल कंठाळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन योगिता गोसावी यांनी केले.
