कार्यक्षम व पारदर्शक सेवा पुरविण्यासाठी ई-प्रोजेक्ट लाभदायी
प्रधान महालेखाकार जया भगत
नागपूर,दि.27 : कार्यालयीन कामकाजामध्ये गती आणण्यासाठी ऑनलाईन सेवा सुविधांसह ई-प्रोजेक्टची महत्वपूर्ण भूमिका आहे. महाराष्ट्र शासनात कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी, कार्यालयाशी निगडित असलेली विविध लेखा विषयक कामे आता ई-प्रोजेक्टच्या माध्यमातून तत्काळ मार्गी लागतील, असे प्रतिपादन प्रधान महालेखाकार जया भगत यांनी केले.
महालेखाकार (लेखा व हकदारी-2) कार्यालयात ई-प्रोजेक्टच्या माध्यमातून कामकाजास आजपासून प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त आयोजित शुभारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी वरिष्ठ उपमहालेखाकार अक्षय खंडारे, डॉ. भुषण भिरुड, जे. बी. गुप्ता, वरिष्ठ लेखा अधिकारी कुलभूषण शर्मा, सहाय्यक लेखाधिकारी रिर्चड डिमेलो, आशिष चौरासिया, टि.के. बालकृष्णन, समता अग्रवाल व मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना आता महालेखाकार कार्यालयामार्फत कार्यक्षम आणि पारदर्शक सेवा अधिक जलद गतीने पुरविल्या जातील. नागपूरच्या प्रधान महालेखापालांद्वारा सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. महाराष्ट्र राज्यातील सामान्य भविष्य निर्वाह निधी अभिदाता, निवृत्तीवेतनधारकांना सेवा पुरवण्यासाठी नागपूरच्या प्रधान महालेखापाल कार्यालयाने डिजिटल उपक्रम हाती घेतला असल्याचे प्रधान महालेखाकार जया भगत यांनी सांगितले. या प्रोजेक्टद्वारे पेंशन आपल्या दारी उपक्रमांतर्गत घरबसल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ऑनलाईन सेवा उपलब्ध होणार आहेत. कोणतेही भूगतान सुलभ मिळण्यास ई-प्रोजेक्टचा लाभ होणार आहे, असे त्या म्हणाल्या.
ई-प्रोजेक्ट अंतर्गत ई-पीपीओ, ई-जीपीएफ व ओजीआरएफ या तीन सेवांचा अंर्तभाव असून यामुळे अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना यांना कमी वेळात, कमी खर्चात घरबसल्या सर्व काम करता येईल. विदर्भ आणि मराठवाड्यातील निवृत्तीवेतनधारक आणि सामान्य भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) अभिदात्यांना लाभ देण्यासाठी ई-प्रोजेक्टची सुरुवात केली आहे. या उपक्रमांचा उद्देश ऑनलाइन सेवांद्वारे वापरकर्त्याचा अनुभव सुव्यवस्थित करणे हा आहे.
यावेळी निवृत्तीवेतनधारकांना ईलेक्ट्रॉनिक भुगतान आदेशाचे वितरण करण्यात आले. त्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
