शिवसेना जिल्हाप्रमुखपदी ए.जे. बोराडे यांची नियुक्ती ; कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष……
प्रतिनिधी नामदेवराव मंडपे मंठा
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांनी शिवसेनेच्या जालना जिल्हा प्रमुखपदी ए. जे. बोराडे यांची नियुक्ती केल्याने मंठा, परतूर तालुक्यासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष व्यक्त केला. ना. शिंदे यांनी माजी मंत्री तथा आ. अर्जुनराव खोतकर, आ. हिकमतराव उढाण, शिवसेना सचिव संजय मोरे, उपनेते आनंद जाधव, संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर यांच्या उपस्थितीत ए जे बोराडे यांना जिल्हाप्रमुख पदाचे नियुक्तीपत्र दिले. श्री बोराडे यांनी आपल्या 30 ते 35 वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय कार्यकाळात समाजाभिमुख व लोकोपयोगी अनेक कामे केली. त्यांनी मोर्चे आणि आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासह त्यांनी बहुतांश ग्रामपंचायतीवर कार्यकर्त्यांना संधी दिली. ए. जे. बोराडे यांनी यापूर्वी उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख म्हणून 16 वर्षे जबाबदारी सांभाळली. उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांनी जालना येथे झालेल्या प्रवेश सोहळ्यात ए जे बोराडे यांच्या कामाचे कौतुक केले होते. त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिल्यानंतर आता कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला. त्यांच्या नियुक्तीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज रविवार ता. 23 रोजी मंठा येथे आगमन होताच बाजार समितीच्या आवारात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले…………………….. चौकट : शिवसेनेचे संघटन मजबूत करणार — ए जे बोराडे…. शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली असून या माध्यमातून जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन मजबूत करणार असून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी सांगितले.
