सुदृढ आरोग्यासाठी “स्वच्छतेचे महत्व” विषयावर थेपडे विद्यालयात व्याख्यान संपन्न
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
तालुक्यातील म्हसावद येथील स्वातंत्र्य सैनिक पं.ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात “सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छतेचे महत्व” या विषयावर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी डी चौधरी सर यांनी गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता- २०२४ अंतर्गत विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
त्यांनी आपल्या व्याख्यानात स्वच्छतेचे महत्त्व विशद करताना सांगितले की, स्वच्छता आपल्याला अनेक संसर्गजन्य रोगांपासून दूर ठेवते .आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवते. शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक स्तरावर आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मदत करते. स्वच्छतेच्या योग्य सवयीमुळे संक्रमणाचा प्रसार कमी होतो. स्वच्छतेमुळे सुरक्षित वातावरण निर्माण होते. स्वच्छ वातावरणामुळे जिवाणू, विषाणू आणि बुरशी यासारख्या हानिकारक सूक्ष्मजीवांचा प्रसार रोखण्यास मदत होते. जेवणाआधी नियमितपणे हात धुण्याच्या सवयीमुळे हातावरील जिवाणू ,विषाणू पोटात जात नाहीत.
हातांची स्वच्छता ही संसर्ग रोखण्यासाठी सर्वात प्रभावी अशी आरोग्याची गुरुकिल्ली आहे, हे सांगताना त्यांनी अन्नजन्य आजारांचे प्रमुख कारण दूषित हात असतात.साबण आणि पाण्याने हात धुण्याची कृती अतिसाराच्या आजारांची शक्यता ५० टक्के पर्यंत कमी करते, अशी माहिती दिली.
घराची स्वच्छता केली नाही, तर घरातील वातावरण बाहेरील वातावरणापेक्षा जास्त दूषित आणि एलर्जीने भरलेले बनू शकते. त्यामुळे आपल्याला श्वसनाचे आजार होतात. स्वच्छता हे भगवंताचे दुसरे रूप असते.म्हणून आपले घर आणि आपला परिसर आपण नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. त्यासाठी स्वच्छतेबाबत आपण काही मूलभूत सवयींचा अंगीकार सुद्धा करायला हवा असे त्यांनी स्पष्ट केले.त्या मूलभूत सवयी म्हणजे नखे नियमितपणे कापावीत, दररोज आंघोळ करावी, शौचालय वापरल्यानंतर हात- पाय धुणे, जेवणापूर्वी आणि जेवणानंतर हात धुणे, दररोज दात घासावेत या मूलभूत सवयींचा आपण अंगीकार केल्यास आपले संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होऊन आपण स्वस्थ आणि चांगले जीवन जगू शकतो असा मौलिक सल्ला देऊन त्यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यास प्रोत्साहन दिले.
विचार मंचावर विद्यालयाचे उप मुख्याध्यापक श्री बच्छाव सर, पर्यवेक्षक के. पी .पाटील सर, ज्येष्ठ शिक्षिका हुजरे मॅडम, नेवे मॅडम,शिक्षक प्रतिनिधी सचिन चव्हाण सर, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख योगराज चिंचोरे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी सदर व्याख्यानाचा मनःपूर्वक लाभ घेतला.
