आदित्य चव्हाण : बलुचिस्तान : बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले आहे.एवढेच नाही तर बलुच आर्मीने ट्रेनमधील सर्व प्रवाशांना ओलिस ठेवले आहे. बलुच लिबरेशन आर्मीने समाजमाध्यमांवर ट्रेन अपहरणाची माहिती दिली.
जाफर एक्सप्रेस पाकिस्तानच्या नैऋत्य बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा येथून खैबर पख्तूनख्वा येथील पेशावरला जात असताना ही घटना घडली. बलुच लिबरेशन आर्मीने समाज माध्यमांवर एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ही कारवाई मश्काफ, धादर, बोलान येथे करण्यात आली. जिथे त्याच्या सैनिकांनी रेल्वे ट्रॅक उडवून दिला. यामुळे जाफर एक्सप्रेस थांबवावी लागली आणि ट्रेन नियंत्रणात आणण्यात आली.
‘जर लष्करी कारवाई सुरू झाली तर ओलिसांना मारले जाईल’
बलुच लिबरेशन आर्मीच्या म्हणण्यानुसार, सर्व प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले होते.पाकिस्तानी सैन्याने कोणत्याही लष्करी कारवाईचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम गंभीर होतील आणि सर्व ओलिसांना मारले जाईल अशी धमकी बीएलएने दिली आहे. या हत्यांची जबाबदारी पूर्णपणे लष्कराची असेल.
६ सुरक्षा कर्मचारीही शहीद
बलुच लिबरेशन आर्मीने दिलेल्या माहितीनुसार हे ऑपरेशन माजिद ब्रिगेड, एसटीओएस आणि फतेह स्क्वॉड संयुक्तपणे करत आहेत. कोणत्याही लष्करी घुसखोरीला तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल. आतापर्यंत सहा लष्करी जवानांचा मृत्यू झाला आहे आणि शेकडो प्रवासी ताब्यात आहेत. या कारवाईची संपूर्ण जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मी घेत आहे.
दहशतवाद्यांचा ट्रेनवरही केला गोळीबार.
पाकिस्तानी वाहिनी समा टीव्हीनुसार, जाफर एक्सप्रेसवर जोरदार गोळीबार झाला आहे. सुरुवातीच्या वृत्तांचा हवाला देत, वाहिनीने म्हटले आहे की गोळीबारात ट्रेन चालक जखमी झाला असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनीही ट्रेनच्या ९ डब्यांमध्ये सुमारे ५०० प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती दिली आहे.या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे आणि दहशतवाद्यांवर कारवाई सुरू केली आहे.
बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी जाफर एक्सप्रेसवर गोळीबार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. रेल्वे नियंत्रक मुहम्मद काशिफ म्हणाले की, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारी निवेदनानुसार, सिबी रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे, रुग्णवाहिका आणि सुरक्षा कर्मचारीही घटनास्थळी पोहोचत आहेत.
