अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…
▪️16 ते 22 मार्च या कालावधीत होणाऱ्या जलजागृती सप्ताहाबाबत व्यापक बैठक.
सतीश कडू नागपूर, दि.06 : उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटेकोर उपयोग व्हावा व निसर्गाची अमूल्य असलेली ही देणगी अधिक काळजीपूर्वक जपण्यासाठी केवळ मशिनरीचा उपयोग करुन चालणार नाही. यांत्रिकीकरण व उच्च तंत्रज्ञानासह प्रत्येक व्यक्तींनी पाणी व निसर्गाप्रती असलेल्या वर्तनात अधिक जबाबदार जाणीव जागृतीची गरज असल्यचे प्रतिपादन विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के यांनी केले.
जलजागृती सप्ताहाचा पूर्व तयारीसाठी सिंचन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस वनराई स्वयंसवी संस्थेचे मधूभाऊ घारड, पाणी वापर संस्था वरुडचे अध्यक्ष डॉ.विजय देशमुख, निसर्ग सेवा समिती वर्धाचे संचालक मुरलीधर बेलखोडे, पारंपारिक बिज संवर्धक अविल बोरकर, निसर्ग विज्ञान मंडळाचे नेत्रवन प्रकल्पाचे डॉ. विजय घुगे, गोंडवाना विद्यापीठाचे वरिष्ठ फेलो मिलिंद जोशी, जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन, जल आयोग माजी सदस्य प्रा. उल्हास फडके, डॉ. विजय देशमुख, संपूर्ण विदर्भातील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व वरिष्ठ अधिकारी या बैठकीस प्रत्यक्ष व दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
जल साक्षरतेसाठी पाण्याशी संबधित कार्यरत असलेल्या विविध संस्था, पाणी वापर संस्था यांचे योगदान मोलाचे ठरु शकते. पाणी वापर सारख्या संस्थांना अधिकाधिक बळकटी मिळावी, त्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हाव्यात ही शासनाची भूमिका आहे. शासनाचा आवश्यक तेवढाच सहभाग व बाकीची लोक चळवळ जर झाली तर पाणी वापराप्रती समाजाला अधिक सजग करणे आपल्याला शक्य होईल, असे सोनटक्के यांनी सांगितले.
महानगरांच्या विस्तारामध्ये छतावरील पाण्याचा प्रभावी उपयोग, जाणीव जागृतीसाठी शाळा व शिक्षण संस्थांचा सहभाग, बांधकाम क्षेत्रातील विविध संघटनांचा जलसाक्षरतेसाठी सहभाग, पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण, कृषी क्षेत्रातील पाण्याच्या काटेकोर वापरासाठी उच्च कृषी तंत्रज्ञान, जल प्रद्रूषणाबाबत जनजागृती, वृक्षारोपण आदी विषयांबाबत विविध मान्यवरांनी बैठकीत आपले मते मांडली. दिनांक 16 ते 22 मार्च या कालावधीत नागपूर विभागातील जलसप्ताह अधिकाधिक प्रभावीपणे राबविल्या जाईल, असे सर्वानूमते ठरविण्यात आले.
