हर घर नल से जल’ अंतर्गत नागपूर विभागात 90.68 टक्के कुटुंबांना नळ जोडणी
प्रतिनीधी सतीश कडू नागपूर
नागपूर, दि. 04 : राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे गुणवत्तापूर्ण केंद्र पुरस्कृत जलजीव मिशन राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ठरविण्यात आलेल्या ‘हर घर नल से जल’ उद्दीष्टानुसार वर्ष 2024-25 अंतर्गत नागपूर विभागात 16 लाख 48 हजार 104 कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे. तर 58 हजार 246 घरांना नळ जोडणी देण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्याची सुरक्षा देण्यासाठी प्रत्येक घरात कार्यत्मक नळ जोडणीद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. यानुसार गाव, जिल्हा व राज्य कृती आराखडा तयार करण्यात येतो. यानुसार नियोजित घरगुती नळ जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे त्रैमासिक व वार्षिक नियोजन करण्यात येते. यासाठी गाव कृती आरखडा तयार करण्याकरिता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मदत घेण्यात येते. नागपूर विभागातही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासकीय यंत्रणा प्रभावीपणे कार्य करीत आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी वेळोवेळी बैठक घेवून माहिती घेतात व सूचना करतात.
जलजीवन मिशन अंतर्गत विविध प्रकारच्या योजनांचा समावेश करण्यात येतो. अशा योजनांची सुधारात्मक पुनर्जोडणी करून कार्यत्मक घरगुती नळ जोडणी देण्यात येते. गावपातळीवर पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार पुनर्जोडणी योजनांचा समावेश करण्यात येतो. जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल से जल’ लक्षाप्रमाणे नागपूर विभागाने उत्तम कामगिरी करत 90.68 टक्के कुटुंबांना नळ जोडणीचे काम पूर्ण केले आहे. सहा जिल्ह्यांमध्ये एकूण 18 लाख 17 हजार 590 कुटुंबांपैकी फेब्रुवारी 2025 अखेर 16 लाख 48 हजार 104 कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली असून 58 हजार 246 कुटुंबांसाठीचे नळ जोडणीचे काम प्रगती पथावर आहे.
या लक्षाच्या दिशेने वर्धा जिल्ह्याने विभागात आघाडी घेत 98.25 टक्के नळ जोडणी पूर्ण केली आहे. वर्धा जिल्ह्याची कामगिरी सरस असून 2 लाख 38 हजार 942 कुटुंबांपैकी 2 लाख 34 हजार 754 कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे. तर 1 हजार 989 नळ जोडणी प्रगतीपथावर आहे. नागपूर जिल्ह्यानेही आघाडी घेत 97.25 टक्के नळ जोडणी पूर्ण केली आहे. नागपूर जिल्ह्यात 3 लाख 76 हजार 864 कुटुंबांपैकी 3 लाख 66 हजार 495 कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली असून 1 हजार 916 नळ जोडण्या प्रगतीपथावर आहेत.
भंडारा जिल्ह्याने 2 लाख 56 हजार 684 कुटुंबांपैकी 2 लाख 19 हजार 221 कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे. तर 9 हजार 465 नळ जोडणीचे काम प्रगतीपथावर आहे. चंद्रपूर जिल्ह्याने 3 लाख 95 हजार 251 कुटुंबांपैकी 3 लाख 56 हजार 441 कुटुंबांना नळ जोडणी दिली आहे. तर 18 हजार 488 कुटुंबांना नळ जोडणी देण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
गडचिरोली या दुर्गम तथा नक्षलग्रस्त जिल्ह्याची ‘हर घर नल से जल’ लक्ष गाठण्याच्या दिशेने असलेली प्रगतीही उल्लेखनीय आहे. या जिल्ह्यात 2 लाख 42 हजार 119 कुटुंबांपैकी 2 लाख 21 हजार 837 कुटुंबांना जळ जोडणी देण्यात आली असून 6 हजार 351 नळ जोडणी प्रगती पथावर आहे. गोंदिया जिल्ह्याची लक्षाच्या दिशेने प्रगती सुरू असून 3 लाख 7 हजार 730 कुटुंबांपैकी 2 लाख 49 हजार 356 कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे तर 20 हजार 37 नळ जोडणी प्रगतीपथावर आहे
