अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
सतिश कडु : जिल्हा खनिज प्रतिष्ठान नागपूर यांच्याकडून निधीची तरतूद २४० ई रिक्षा व ४०० मोटोराइज्ड ट्रायसिकल
नागपूर दि. १:- जिल्ह्यातील तब्बल ६४० गरजू दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे व त्यांना सुखकर जीवन जगता यावे या उद्देशाने सामाजिक न्याय विभागामार्फत ई- रिक्षा व मोटोराइज ट्रायसिकलचे वाटप आज महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून ही योजना साकारली असून या योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचता यावे या दृष्टीने सामाजिक न्याय विभागाने नियोजन केले आहे. या अभिनव योजनेसाठी ई-रिक्षा करता सहा कोटी रुपये व मोटर ट्रायसिकलसाठी चार कोटी रुपयांचा निधी जिल्हा खनिज प्रतिष्ठान नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेला आहे.
सामाजिक न्याय विभागांतर्गत या योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांना व्हावा या दृष्टीने विविध माध्यमाद्वारे माहिती पोहोचवून अर्ज मागविण्यात आले. विविध लाभार्थ्यांच्या आलेल्या अर्जांमधून ६४० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असे सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
निवड झालेल्या या ६४० पात्र लाभार्थ्यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली. एक विशेष शिबिर तपासणीसाठी आयोजित करण्यात आले होते. जे लाभार्थी सदर ई-रिक्षा वाहन चालविण्यास पात्र ठरले अशा लाभार्थ्यांचे शिफारस पत्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे.
प्रथम टप्प्यात २ मार्च रोजी १०० ई रिक्षा व १०० मोटोराइज्ड ट्रायसिकलचे वाटप होईल.
