अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी दौलत सरवणकर
छत्रपती शिवाजी महाराज ३९५ वी जयंती
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर फाल्गुन वद्य तृतीया, शक १५५१, पुर्षा नक्षत्रात, धनु लग्नात आणि सिंह राशीत सूर्योदयाच्या सुमारास सकाळी ६.३० ते ७.३० दरम्यान झाला होता. (ता. १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये). शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती, म्हणून या मुलाचे नाव ‘शिवाजी’ ठेवले गेले. शिवाजी महाराजांचा बारसा शिवनेरी गडावर झाला, यावेळी शिवाजी महाराजांच्या आई सोबत, वडील शहाजी भोसले, आजोबा मालोजी भोसले, बाबाजी भोसले, आणि भोसले घराण्यातील इतर नातेवाईकांबरोबर किल्लेदार आणि काही मावळे उपस्थित होते.
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मावेळची भारतातील आणि महाराष्ट्रातील परिस्थिती :*
छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, त्यावेळी शिवनेरी हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता. जिजाबाईंनी शिवनेरीवर अत्यंत सुरक्षित ठिकाणी शिवाजी महाराजांना जन्म दिला. किल्यावर मोठा पहारा होता. कारण, शत्रूंच्या हल्ल्यांची दाट शक्यता होती. जन्मानंतर मोठ्या सतर्कतेने त्यांचे संगोपन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्र आणि विशेषतः त्यांच्या कुटुंबावर प्रतिकूल परिस्थिती होती. त्यांचे वडील शहाजी राजे भोसले हे विजापूरच्या आदिलशाहीच्या सेवेत होते, तर आई जिजाबाई यांनी पुण्याजवळील कोंढाणा आणि आसपासच्या भागात राहून मुलाच्या संगोपनाची जबाबदारी उचलली होती.
पुणे आणि आसपासचा भाग मुघल आणि आदिलशाही यांच्यात लढाईचा केंद्रबिंदू बनला होता. त्या काळात पुणे हा फारसा विकसित प्रदेश नव्हता; पुण्यात मुघल आणि आदिलशाही यांच्यातील लढाई मुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झालेला होता. आदिलशाहीच्या अधिकाऱ्यांनी अनेक मराठ्यांच्या कुटुंबावर कठोर बंधने घातली होती.
उत्तरेकडे, १६२७ मध्ये मुघल सम्राट जहांगीरचे निधन झाल्यानंतर त्याचा मुलगा शहाजहान गादीवर आला. शहाजहानने आपल्या कारकिर्दीची सुरुवात विद्रोह दडपून आणि राज्यसंस्था मजबूत करून केली. भारताच्या विविध भागांवर मुघल सत्तेचा प्रभाव वाढत होता. मुघल सरदार दक्षिण भारतावर आक्रमण करण्याच्या तयारीत होते. तर, दक्षिणेकडे विजापूरच्या आदिलशाहीचा राज्यकर्ता मोहम्मद आदिलशाह होता.तसेच गोलकोंड्याच्या कुतुबशाहीचा प्रभावही वाढत होता. आदिलशाही आणि मुघलशाही यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. दक्षिण भारतातील अनेक हिंदू राजे मुघल आणि आदिलशाहीच्या राजवटीत दबले गेले होते. मुघल आणि आदिलशाही राज्यकर्ते हिंदू समाजावर जुलूम करत होते. मंदिरे तोडली जात होती आणि जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले जात होते. मराठ्यांना स्वतंत्र राजकीय अस्तित्व नव्हते; त्यांना मोठ्या प्रमाणावर आदिलशाही आणि मुघलशाहीच्या अंमलाखाली राहावे लागत होते.
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जगभरातील परिस्थिती :*
युरोपमध्ये त्या वेळी पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश वसाहती वाढत होत्या. तुर्क साम्राज्याचा प्रभाव मध्य पूर्वेत वाढला होता. इंग्लंडमध्ये राजा चार्ल्स पहिला सत्तेवर होता. आणि, पोर्तुगीज गोव्यात मजबूत स्थितीत होते आणि भारतीय व्यापारावर त्यांचा प्रभाव वाढला होता.
*जन्मतारीख मतभेद :*
छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख तारखेप्रमाणे मानावी की तिथीप्रमाणे मानावी यात आजही मतभेद आहेत. शिवाय इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीखही मानली जात होती. पण साल २००१ मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख म्हणून स्वीकारली आणि शासकीय सुट्टी जाहीर केली, कारण तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला दरवर्षी तारीख ही बदलली जाते. म्हणून शासन तारखेनुसार शिवजयंती साजरी केली जाते.
*शिवजयंती इतिहास :*
१८६९ साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली आणि पुढे १८७० साली त्यांनी पुणे येथे पहिली ‘शिवजयंती’ साजरी केली. त्यानंतर १८९५ मध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता. सुरुवातीच्या काळात शिवजयंती फक्त महाराष्ट्रात साजरी होत होती. परंतु २० व्या शतकाच्या पहिल्या दशकात शिवजयंतीचा उत्सव बंगालमध्ये जाऊन पोहोचला.
*कशी केली जाते शिवजयंती साजरी :*
भगव्या पताका आणि आकर्षक विद्युत रोषणाई हे आकर्षणाचे केंद्रबिंदू असते. सार्वजनिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, शिवाजी महाराजांची गाणी ऐकणे, शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करणे, सार्वजनिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, सत्यनारायणाच्या पुजेचे आयोजन, बाईक रॅली, एकमेकांना शिवाजी महाराजांचे सुविचार पाठवून, शिवाजी महाराजांची पुस्तके भेट देऊन, शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित नाटके अथवा पथनाट्याचे आयोजन करून हा उत्सव साजरा केला जातो.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा भारताच्या इतिहासातील एक सोनेरी क्षण होता. त्यांच्या जन्मावेळी असलेल्या परिस्थितीपासून ते त्यांच्या नावकरणापर्यंत, प्रत्येक घटना ही भविष्यातील एका महान योद्ध्याच्या रूपरेषा स्पष्ट करणारी होती. शिवाजी महाराजांचे जीवन, त्यांचे विचार आणि कार्य आजही देशासाठी प्रेरणादायी आहेत.
🚩 *।। अखंड हिंदुस्तानचे आराध्यदैवत, प्रौढ़ प्रताप पुरंदर, सिंहासनाधीश्वर, रयतेचा राजा, राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राजेंना मानाचा मुजरा ।।* 🚩
*अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी :-श्री. दौलत सरवणकर
