पवार विद्यामंदिरमध्ये पर्यावरणाचा जागर
संपादक संतोष लांडे
पुणे- पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षण प्रसारक मंडळाच्या सौ. प्रतिभा पवार विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘जागर पर्यावरणाचा’ या विषयावर उत्साहात पार पडले.
या वेळी स ला ते स ला ना ते या चित्रपटातील अभिनेत्री रिचा अग्निहोत्री प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच थिएटर इन एज्युकेशनच्या कोऑर्डीनेटर अश्विनी अरे, निर्माण संस्थेच्या सेंटर मॅनेजर राजश्री भोसले, सानेगुरुजी कथामालेचे समन्वयक श्यामराव कराळे, मुख्याध्यापक श्याम धुमाळ, मारुती माळवे, धनंजय महामुनी,आम्रपाली धुमाळ आदी मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शैक्षणिक वर्षामधील गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यशवंतराव चव्हाण नाट्यस्पर्धेत तालुकास्तरावर विजयी झालेल्या विद्यार्थ्यांनाही पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. शाळेतील माजी विद्यार्थी महिला पालकांनी गणेशवंदना सादर केली.
हा नदी हो नदी, आओ दोस्तो तुमको बताये पर्यावरण के बारे मे, हा नाश थांबवा, तुफान आलया, किलबिल पक्षी बोलती अशी पर्यावरणपूरक गाणी तसेच प्लास्टिक प्रदूषण, पाणी बचतीचे महत्त्व, पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण इत्यादी विषयांवरील गाण्यांवर नृत्य करून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जागरूकता निर्माण केली. सर्व गाण्यांमधून विद्यार्थ्यांनी पर्यावरणसंबंधी समस्यांची जाणीव, त्याचे परिणाम व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलण्याचा पालकांना संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी मेमाणे, शुभांगी राऊत यांनी केले. विठ्ठल पवार यांनी आभार मानले.
