अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र उंब्रज पोलीस, अन्न, औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
उंब्रज प्रतिनिधी कलावती गवळी
गुटख्यावर बंदी असतानाही चोरून गुटखा विकणाऱ्या पानटपऱ्यांवर उंब्रज पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाने संयुक्त छापासत्र सुरू केले. टपऱ्यांमधून गुटख्याचा अवैध साठा हस्तगत करण्यात आला असून पोलिसांकडून अजुनही छापासत्र सुरूच आहे. उंब्रज परिसरात केलेल्या कारवाईने अवैध व्यावसायिकांना दणका बसला आहे.
उंब्रज परिसरात अवैध गुटखा विकला जात असल्याची माहिती पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाला मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रूपनवर यांनी अचानक कारवाईच्या सुचना देत एकाचवेळी तीन पानटपऱ्यांवर कारवाई केली. राहूल पान शॉप, ए. के. पान शॉप, सिद्धीविनायक पान शॉप या पानटपऱ्यातून हजारोंचा गुटख्याचा साठा हस्तगत केला आहे. गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली असून गुटखा जप्त केला आहे. यापुढेही उंब्रज परिसरात अवैध गुटख्याची विक्री करणारांवर कडक कारवाई करणार असल्याचे रविंद्र भोरे यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांकडून अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांच्या नाड्या आवळण्याचे काम सुरू झाले आहे. कारवाईचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर करत आहेत.
