मुंबई अंधेरी | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संपादकीय
अंधेरी उपनगराचा एक भाग असलेला आंबोली नाका हा परिसर नेहमीच वाहने आणि माणसांनी गजबजलेला असतो. मुंबई शहराप्रमाणे येथेही प्रत्येकाला पुढे जायची घाई असते. मागे वळून पाहण्यासाठी वेळच नसतो
आजही तीच परिस्थिती होती. आजही नित्याप्रमाणे सारं काही सुरु होतं पण अचानकच वातावरणात ‘आग आग’ असा कोलाहल ऐकू येऊ लागल्याने धावणारी पावलं जागीचं स्तब्ध झाली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भय मिश्रित कुतूहल दाटून आलेलं.
आंबोली नाक्यावर स्थित “आलिया वूड वर्क” या दुकानाला शॉर्टसर्किट मुळे आग लागली आणि आकाशात धुराचा मोठा लोण पसरला.. आग हळूहळू विकराळ रूप धारण करून आजूबाजूची दुकाने कवेत घेऊ पाहू लागली. रस्त्यावर
बघ्याची संख्या वाढत होती. या दरम्यान कोणा जागरूक नागरिकाने अग्निशमन दलाला फोन देखील केला. पण आगीची व्याप्ती पाहता प्रत्येकाच्या छातीत धडकी भरली होती..
पुढे काय होईल!या कल्पनेने प्रत्येक मन कासावीस झाले होते . देवाचा धावा सुरु झाला होता
आणि त्याच वेळी जणू एक चमत्कार घडला…होय चमत्कारच!
कारण त्याचवेळी महानगर पालिकेची ‘सेक्शन कम जेटिंग मशीन’ ट्रामा केयर येथील तक्रार अटेंड करून पुन्हा वर्सोवा बिट कडे जाण्यास निघाली होती.
गाडीवरील कर्मचाऱ्यांना सदर आग निदर्शनास येताच त्यांनी क्षणाचा विलंब न करता वाहन रस्त्याच्या मधोमध आडवे करीत विजेच्या गतीने पाण्याचा प्रेशर पाईप(चॉक काढण्यास उपयोगात येणारा) काढून आगीवर पाण्याची फवारणी सुरु केली आणि काही क्षणातच अग्निशमन दलाच्या जवानाप्रमाणे आगीवर नियंत्रण मिळविले.
हा सारा घटनाक्रम केव्हणी पाड्यातील रहिवासी श्री.प्रदीपभाई मोरे स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होते . त्यांना त्या पालिका कर्मचाऱ्यांचे खुप कौतुक वाटून गेले. त्यांच्या प्रसंगावधान आणि जिगरबाजपणाने प्रदीपभाई अगदी भारावूनच गेले.
त्यांच्या कामाचे जाहीर कौतुक व्हावे म्हणून त्यांनी त्या साऱ्या कर्मचाऱ्यांची नावे लिहून घेतली तसेच त्यांनी मला यावर लिहिण्यास सांगितले .
• सदर कर्मचाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे –
१)अरविंद जाधव
२)प्रदीप पाटे
३)प्रदीप मोरे (मुकादम )
४)भावेश रेवाळे.
५)अमोल यादव.
पालिका कर्मचाऱ्यानो आग विझविणे हे तुमचं काम नसताना फक्त माणुसकीपोटी तुम्ही हे अनमोल कार्य केलंय.तुमच्या कार्याला सलाम.