नागपूर | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | मुख्य संपादक संतोष लांडे किरण सोनवणे.
– भदंत ज्ञानेश्वर आणि आकाश लामा मुख्य अतिथी.
– भदंत सुरेई ससाई यांची माहिती.
– मुख्य कार्यक्रम शनिवारला.
– तीन दिवसीय धम्मदीक्षा सोहळा.
नागपूर : पवित्र दीक्षाभूमी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीच्या वतीने ६८ व्या प्रवर्तन वर्धापन दिन कार्यक्रमाचे गुरुवार १० ते शनिवार १२ ऑक्टोबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. मुख्य सोहळा १२ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून कुशीनगर (उत्तरप्रदेश) भिक्षु संघाचे अध्यक्ष भदंत ए.ए.बी. ज्ञानेश्वर, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते आकाश लामा, दीक्षाभूमी बुध्दीस्ट सेमिनरीचे भंते आणि दीक्षाभूमीसाठी अतिरीक्त जागा मिळावी यासाठी न्यायालयीन लढा देणारे अॅड शैलेंद्र नारनवरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. भंते ज्ञानेश्वर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दीक्षा देणारे महास्थवीर चंद्रमणी यांचे शिष्य होत, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी माध्यमांना दिली.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने १० ऑक्टोबरला सकाळी ९.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जून सुरई ससाई यांच्या उपस्थितीत भिक्खू संघ, उपासक व श्रामणेर यांना दीक्षा देतील. धम्मदीक्षेचा हा कार्यक्रम सलग तीन दिवस चालणार आहे. त्यानंतर उपासकांना धम्मदीक्षा प्रमाणपत्र वितरित होईल. शुक्रवार ११ ऑक्टोबरला ९ वाजता ससाईंच्या हस्ते पंचशील ध्वजारोहन होईल. यावेळी समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात येईल. सायंकाळी ६ वाजता प्रबुद्ध बागडे व संचाद्वारे बुद्ध व भीम गीतांचा कार्यक्रमासह नृत्य व नाटक (अंगुलीमाल व अग्रपाली) सादर करण्यात येणार आहे. शनिवार १२ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता भदंत ससाई यांच्या उपस्थितीत सामुहिक बुद्ध वंदना सायंकाळी ६ वाजता ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम भदंत ससाई यांच्या अध्यक्षतेखाली होईल.
स्मारक समितीतर्फे बुद्ध वंदना घेण्याचे आवाहन.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमी येथे सकाळी ९ वाजता महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली त्याप्रसंगाची आठवण म्हणून यंदाही सोमवार १४ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता दीक्षाभूमीवर भदंत ससाई यांच्या प्रमूख उपस्थितीत बुद्ध वंदना घेण्यात येईल. याचवेळी संपूर्ण नागपूर शहरातील बुद्ध विहारात बुद्ध वंदना घेण्यात यावी, असे आवाहन स्मारक समितीच्यावतीने बौद्ध उपासक-उपासिकांना करण्यात आले आहे.